नाशिक – महापालिकेच्या द्वारका परिसरातील झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन टाकीत गळती झाल्यामुळे तब्बल २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
हॉस्पिटलच्या ठिकाणी असलेल्या टाकीत ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन भरण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी ऑक्सिजनची गळती सुरू झाली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनवर असलेल्या १३१ रुग्णांचा जीव धोक्यात आला. जवळपास एक ते दीड तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने २२ रुग्ण ठार झाले आहेत. या घटनेमुळे रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या. मात्र, त्यात पूर्ण यश आले नाही. तर, मृतांचा आकडा वाडढण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेची रेस्क्यू टीम, पोलिसांचे रॅपिड अॅक्शन फोर्स आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. तासभर या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. एकीकडे ऑक्सिजन मिळत नसताना थेट ऑक्सिजनची गळती झाल्याने २२ रुग्णांचा जीव गेला आहे.
गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून गळतीच्या ठिकाणी तांब्याचा पाईप जोडण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश
ही दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला आहे. महापालिकेचा कारभार योग्य नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.
पोलिसांचा फौजफाटा
दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांचा मोठा फौजफाटा हॉस्पिटलच्या परिसरात दाखल झाला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1384776784818757633