इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आणि त्यानंतर सोशल मिडियावर मिम्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘आज मै सफरचंद से भी अमीर हो गया माँ’, ‘एक टमाटर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’, ‘टमाटर नहीं, टमाटरजी बोलो’ अशाप्रकारचे मिम्स तयार झाले आहेत. पण वाराणसीच्या एका भाजीविक्रेत्याने टोमॅटोला ‘झेड प्लस’ सुरक्षा देऊन हद्दच केली आहे.
वाराणसीतील अजय फौजी या भाजी विक्रेत्याने त्याचा टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात केले आहेत. यासंदर्भातील एक व्हिडियो समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्वीट केला आहे. आणि टोमॅटोला भाजपने झेड प्लस सुरक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे. फौजीच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरु आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपला धारेवर धरले आहे. अजय फौजी या भाजी विक्रेत्याने जोपर्यंत आपल्याकडे टोमॅटोचा साठा आहे तोपर्यंत दुकानात बाऊन्सर तैनात ठेवेन, असे स्पष्ट केले आहे. ‘ग्राहक दुकानात येतात, किंमत विचारतात. ते बाऊन्सर्सकडे पैसे देतात आणि त्यांच्याकडून माल घेतात. काही जण तर कुतूहलाने बाऊन्सर्सला पाहण्यासाठी दुकानात येतात, कारण भाजीच्या दुकानात बाऊन्सर तैनात करणे ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट आहे, असेही फौजी म्हणाला.
टोमॅटोचा केक
अजय फौजी स्वतः समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. गेल्या आठवड्यात त्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त टोमॅटोच्या आकाराचा केक कापला आणि लोकांना टोमॅटो वाटले होते. विशेष म्हणजे त्याच कार्यकर्त्याने टोमॅटोच्या रक्षणासाठी बाऊन्सर तैनात केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
म्हणून बाऊन्सर्स
देशात टोमॅटोसाठी मारामारी होत आहे. टोमॅटोची चोरी होत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्येही जोरदार बाचाबाची झाल्याच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार आमच्याही दुकानात घडला त्यामुळे मी दुकानात बाऊन्सर तैनात करण्याचा निर्णय घेतला. ते सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ड्युटीवर असतात, अशी अजय फौजी सांगतो.