नाशिक – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या जन्मदिवस म्हणजे एप्रिल फुल असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात एक आगळ वेगळे आंदोलन करण्यात आले. भारत नगर येथील कप्तान पेट्रोल पंप येथे गाजराने केक कापत तसेच महागाई विरोधात केले आंदोलन केले. यावेळी “एक ही भूल, कमल का फुल”, “अबकी बार, पेट्रोल-डीझेल शंभरी पार”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनाची माहिती देतांना युवक राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सांगितले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर जनतेचे संसार रुळावर येत असताना केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून अनेकांना जगणे मुश्कील आहे. यात इंधनाच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली असताना केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनासह गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करत आहे. केंद्र सरकार अचानक सिलेंडरचे दर वाढवित असून दीडवर्षापासून मिळणारी सबसिडी ही केंद्र सरकारने बंद केली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यातील निवडणुकामध्ये भाजपाला फटका बसू नये याकरिता रोखलेली इंधन दरवाढ दुप्पटीने लावण्यात आली आहे. तसेच देशातील प्रत्येक घरात लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दरही केंद्र सरकार सातत्याने वाढवत आहे. इंधन दरवाढीमुळे अक्षरश: सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. आधीच खाद्य तेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मोदींच्या केंद्र सरकारमुळे वाढलेल्या महागाईनं व इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून पडलं आहे. इंधन दरवाढीसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून महागाईमुळे अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
एप्रिल फुलच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा वाढदिवस असल्यामुळे अवघ्या देशातील जनतेची फसवणूक पंतप्रधानांनी चालवली आहे, असा आरोप यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला. नाशिक शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत महागाई विरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्याच्या महागाईला जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. जमलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवरती आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
यावेळी शादाब सैय्यद, जय कोतवाल, डॉ. संदिप चव्हाण, सुनिल घुगे, सोनू वायकर, राहुल कमानकर, सागर बेदरकर, रेहान शेख, संतोष गोवर्धने, तुकाराम फसाटे, नीलेश खोडे, अभिषेक सराफ, यश खरात, धीरज साळवे, रोहन साळवे, चैतन्य खरात, कन्नूर शहा, मयूर लोखंडे, शहात अरब, अमोल जाधव, विक्की गांगुर्डे, मयूर निकम, रजा शेठ , सचिन झोले, आदिल खान, नदिम शेख, वाजिद शेख आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.