नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) अंतर्गत युवा संगम उपक्रमाच्या पाचव्या टप्प्यासाठीच्या नोंदणी पोर्टलची सेवा सुरु केली. भारताच्या विविध राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेशांतील युवकांमध्ये परस्पर संपर्क वाढवण्यासाठी भारत सरकारतर्फे युवा संगम या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. १८ ते 30 वर्षे वयोगटातील इच्छुक युवक, युवती मुख्यतः विद्यार्थी, एनएसएस/एनवायकेएस स्वयंसेवक, रोजगार/ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती युवा संगम पोर्टलच्या माध्यमातून वर्ष २०२३ मध्ये सुरु झालेल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाच्या आगामी टप्प्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकतात. यासाठी २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत इच्छुकांना नोंदणी करता येईल.
यासंबंधीची तपशीलवार माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे: https://ebsb.aicte-india.org/ युवा संगमच्या पाचव्या टप्प्यासाठी भारतातील २० प्रतिष्ठित शिक्षण संस्थांची निवड करण्यात आली असून या राज्यांतील/ केंद्रशासित प्रदेशांतील नोडल उच्च शिक्षण संस्थांच्या नेतृत्वाखाली तेथील सहभागी अनुक्रमे त्यांच्याशी जोडलेल्या राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना भेटी देतील.
राज्यांच्या जोड्या पुढीलप्रमाणे:
महाराष्ट्र आणि ओदिशा
हरियाणा आणि मध्य प्रदेश
झारखंड आणि उत्तराखंड
जम्मू आणि काश्मीर आणि तामिळनाडू
आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश
बिहार आणि कर्नाटक
गुजरात आणि केरळ
तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश
आसाम आणि छत्तीसगड
राजस्थान आणि पश्चिम बंगाल
युवा संगम दौऱ्यांच्या कालावधीत पुढील पाच विस्तृत क्षेत्रांमध्ये बहु-आयामी अनुभव घेण्याची संधी सहभागींना मिळेल – ती पाच ‘पी’ क्षेत्रे म्हणजे पर्यटन, परंपरा, प्रगती, परस्पर संपर्क आणि प्रोद्योगिकी(तंत्रज्ञान). दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळाला प्रवासाचे दिवस सोडून ५ ते ७ दिवसांच्या कालावधीत या पाच ‘पी’ क्षेत्रांशी संबंधित अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. युवा संगमच्या याआधीच्या टप्प्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांनी या उपक्रमाबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली होती. गेल्या टप्प्यात ४४ हजाराहून अधिक इच्छुकांनी नोंदणी केली होती. वर्ष २०२२ मध्ये राबवण्यात आलेल्या युवा संगमच्या प्रायोगिक टप्प्यासह आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये देशभरातील ४,७९५ युवक,युवतींनी ११४ दौऱ्यांमध्ये भाग घेतला आहे.