इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – युट्यूबवर अक्कल पाजळून लाखो रुपये कमावणाऱ्यांचा सध्या सुळसुळाट आहे. अशाच एका युट्युबरच्या घरी धाड टाकली असताना चक्क २४ लाख रुपयांची कॅश पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या त्याची सगळी कमाई तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक युट्युबर दररोज शेअर बाजाराशी संबंधित माहिती लोकांना देत असतो. त्याच्या व्हिडियोलाही हजारो व्हिव्हर्स आहेत. लाखोंचे लाईक्स पडतात. पण कुणीतरी पोलिसांना माहिती दिली की या तरुणाने आपल्या घरात २४ लाख रुपये रोख अवैधरित्या जमा करून ठेवली आहे. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकली असता त्याच्याकडे तेवढी रोख आढळली. यातील १० लाख रुपये लग्नामध्ये भेट मिळाल्याचे तो पोलिसांना सांगतोय. मात्र आता आयकर विभाग त्याच्याकडे असलेल्या एकूणच रोखीची चौकशी घेत आहे. सोबतच त्याने केलेल्या कमाईचाही तपास करत आहे. या आरोपीचे नाव तस्लीम असे असून युट्यूबवर ट्रेंडिंग हब ३.० या नावाने त्याचे चॅनल आहे. तस्लीमचा भाऊ फिरोज याने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तस्लीम एक प्रामाणिक मुलगा असून तो युट्यूबवरील व्हिडियोच्या माध्यमातून तो कमाई करत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्या वडिलांनी सुद्धा तस्लीमला अकारण फसविण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
१.२० कोटी रुपयांची कमाई
तस्लीमने युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत १.२० कोटी रुपये कमावले असल्याचे त्याने स्वतःच पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे त्याने आयकरही प्रामाणिकपणे भरला आहे. त्याचा तपास केला असता आतापर्यंत त्याने ४० लाख रुपयांचा आयकर भरला आहे.
आलिशान बंगला
तस्लीम याच्याकडे युट्यूबच्या पैशातून एक आलिशान बंगलाही उभारला आहे. तो बीटेक असला तरीही केवळ शेअर बाजाराची माहिती देऊन त्याने आपले वैभव कमावले आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याने कमावलेले पैसे बेकायदेशीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.