इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची जणू काही प्रथाच निर्माण झाली आहे, परंतु यामध्ये काही वेळा विकृत स्वरूप देखील प्राप्त होते. विशेषतः रात्रीच्या वेळी भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना एकमेकांच्या अंगाला केक लावणे, तोंडावर केक फासणे, तलवारीने केक कापणे किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने डीजे लावून इतरांना त्रास होईल, अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करताना धांगडधिंगा करणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
देशभरातील अनेक राज्यात हे विकृत प्रकार दिसून येतात, त्यातच आता काही प्राणी प्रेमी तर आपल्या कुत्र्या- मांजरांचा देखील वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात, यासाठी श्रीमंत व्यक्ती पाण्यासारखा पैसा देखील खर्च करतात. परंतु असे करताना इतरांना त्रास होईल किंवा सध्याच्या काळात कोरोना नियमांचे उल्लंघन होईल याचे भान त्यांना नसते. वास्तविक असे भान ठेवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरात अशाच एका श्वान प्रेमी नागरिकांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या प्रकरणी माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करताना कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भावांसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. चिराग पटेल आणि त्याचा भाऊ उर्विश पटेल, दोघेही अहमदाबाद शहरातील कृष्णनगरचे रहिवासी आहेत, आपल्या पाळीव कुत्र्या ‘एबी’च्या वाढदिवसानिमित्त त्याने आपला मित्र दिव्येश महारियासोबत एक मोठी मेजवानी दिली होती. या समारंभात सुमारे सात लाख रुपये खर्च झाले.
यात तिघांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त त्यांचे मित्रही रात्री एका प्लॉटवर आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी आणि सांगितले की, समारंभात सामाजिक अंतर आणि फेस मास्क घालण्याबाबतच्या कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले. या कार्यक्रमात एका लोकप्रिय लोकगायकाने सादरीकरण केले आणि केकही कापला गेला. मात्र भारतीय दंड संहिता आणि साथीच्या रोग कायद्याच्या विविध कलमांखाली पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला, त्यानंतर चिराग पटेल, उर्विश पटेल आणि दिव्येश महारिया यांना अटक करण्यात आली.