नाशिक – नाशिक जिल्ह्यातील युवा साहित्यिक समीक्षक व प्राध्यापक डॉ. राहुल पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. प्रा. राहुल पाटील नाशिक मधील साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीतील एक कार्यकर्ता होते. स्पष्ट, रोखठोक आणि अभ्यासू बोलण्याने ते सर्वांना परिचित होते.
राहुल पाटील हे नाशिक येथे होणाऱ्या साहीत्य संमेलनाचे ग्रंथ निवड व प्रदर्शन समितीचे प्रमुख होते .वैशाली प्रकाशना तर्फे नुकतेच त्यांचे “मनोहर शहाणे यांचे चरित्र”,हे पुस्तक प्रकाशित केले होते. तसेच “नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांचा गोतावळा” हे त्यांचे पुस्तक लिहून तयार होते.
भोवताल हे त्यांचे अजून एक पुस्तक सुद्धा ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केले आहे. त्यांचे नाशिक व पुण्यातील अनेक प्रकाशकांशी व लेखकांशी घनिष्ठ संबंध होते. अनेक मराठी साहित्य संमेलनातही ते सक्रिय होते. अशा या साहित्यप्रेमीचे अचानक जाणे मनाला चटका लाऊन गेले आहे असून ही हानी कधी न भरून येणारी आहे, अशा शब्दात नाशिकमधील साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. पाटील यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, डॉ. पाटील यांच्या पत्नी आणि भाऊ सध्या उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.