नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोलेट या जुगाराचा फैलाव आता ग्रामीण भागातही झाला आहे. तसेच, या जुगारात खासकरुन तरुण पिढी गुंतल्याची बाब समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील युवकाने रोलेट जुगारामुळे थेट आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच हा युवक सध्या प्राणांशी झुंज देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनेरी येथे राहणारा युवक गोरख त्र्यंबक गवळी हा गेल्या काही महिन्यांपासून रोलेट हा जुगार खेळत होता. त्याला या जुगाराचे इतके व्यसन लागले होते की तो अक्षरशः कर्जबाजारी झाला. आता या विळख्यातून बाहेर येणे त्याला अशक्य होत होते. त्यातच ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतले आहे ते सर्व जण त्याच्यामागे तगादा लावत होते. कर्जबाजारीपणा आणि पैशांचा तगादा यामुळे हा तरुण नैराश्येत गेला. परिणामी, त्याने आज नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाढोली फाट्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आपल्या वाहनात त्याने विषारी औषध नेले. हेच औषध त्याने प्राशन केले. यासंदर्भातील माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या युवकाकडे २ पानी चिठ्ठी सापडली आहे. ही चिठ्ठी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. चिठ्ठीत त्याने म्हटले आहे की, रोलेट या जुगारामुळे आपण कर्जबाजारी झालो. रोलेट संबंधित व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केलेले आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर, तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.