विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अमेरिकेत हजारो किलोमीटर अंतरावरील एका फेसबुक ऑफिसमधून आलेल्या कॉलवरुन आत्महत्येच्या प्रयत्नाचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर सामायिक करणार्या ३९ वर्षीय तरूणाचा जीव वाचवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि अखेर त्याचा वाचविला.
याबाबत पोलिसांना माहिती देताना सांगितले की, पश्चिम दिल्लीतील द्वारका येथील रहिवासी सोहनलाल (नाव बदलले आहे) याने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर स्वत: च्या हाताला अनेक जखमा केल्या, विशेष म्हणजे असे करत असताना त्याने त्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. हे सर्व घडत असतानाच दिल्लीतील एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती डीसीपी अनेश रॉय यांना मिळाली. यासंदर्भात अमेरिकेच्या फेसबुक कार्यालयाकडून थेट कॉल अलर्ट मिळाला.
त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर प्रिव्हेंशन अवेयरनेस अँड डिटेक्शन (सायपॅड), नोडल सायबर युनिट आणि आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समन्वय साधण्यासाठी हा इशारा पाठविण्यात आला. लगेचच पोलिसांनी फेसबुकद्वारे शेअर केलेल्या अकाउंट डिटेलची तपासणी व विश्लेषण केले. फेसबुकशी संबंधित मोबाईल फोन नंबर बंद असल्याचे आढळले. मात्र, मोबाइल नंबरशी जोडलेला पत्ता हा द्वारका परिसरातील असल्याचे पोलिसांना आढळले.
त्यानंतर या पत्त्याच्या परिसरात जवळच असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद वाहन (ईआरव्ही) आणि त्यामध्ये तैनात उपनिरीक्षक अमित कुमार यांनी दिलेल्या पत्त्यावर धाव घेतली. तेव्हा तेथे सदर तरुण आत्महत्या करण्याच्या मार्गावर होता. त्याच्या शरीरातून रक्त सांडत असल्याचे पोलिसांना दिसले. वेळ न दवडता पोलिसांनी त्याला जवळच्या रूग्णालयात नेले आणि नंतर पुढील उपचारार्थ एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सोहन लाल हा एका मिठाई दुकानात काम करतो आणि त्याला दोन लहान मुले आहेत. २०१६ मध्ये पत्नीच्या मृत्यूनंतर तो भावनिक व मानसिकदृष्टया कमजोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शेजारचे सतत त्याला टोमणे मारायचे आणि त्यातून त्याचे भांडण झाले. अखेर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला.