इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात बौद्धिक क्षमतेची कमतरता नाही, या ठिकाणी संशोधक विविध प्रकारच्या शोध लावतात. अगदी खेड्यापाड्यात देखील सर्वसामान्य नागरिक संशोधन करण्याचा प्रयत्न करतात. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील एका इलेक्ट्रिशियनने सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. पेग्रापारा येथील सौम्या रंजन पाले ( वय 28 ) यांनी या सायकलची रचना केली आहे जी 25 किमी प्रतितास वेगाने धावते.
इलेक्ट्रिशियनने सायकलवर सोलर पॅनलचा वापर केला आहे. ही सायकल बनवण्यासाठी सौम्या रंजन पाले यांना तीन महिने लागले. याबाबत पाले यांनी सांगितले की, घरापासून बालासोरपर्यंत या सायकलवर 110 किमीहून अधिक प्रवास केला आहे. या प्रवासात मला सात तास लागले आणि वाटेत विश्रांती घेतली. सदर मोटरसायकल काही दिवसानंतर लॉन्च होईल, तेव्हा दळणवळणात मोठा फरक पडेल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सायकलची क्रेझ, वाढलेली आहे.
याबाबत पाले म्हणाले की, सायकलमध्ये सोलर पॅनल असून त्याचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो. त्याची किंमत अंदाजे 40 हजार रुपये आहे. सदर सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच ते सहा तास उन्हात ठेवावी लागते, त्यानंतर ती सुमारे 150 किमी धावू शकते. सूर्यप्रकाश नसतानाही ती इलेक्ट्रिक सॉकेटद्वारे चार्ज करता येते. पाले यांनी स्पष्ट केले की बॅटरी संपली तर पेडल वापरता येते.