मुंबई – अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचा ह्रदयरोगाच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याने आश्चर्यसुद्धा व्यक्त होत आहे. सिद्धार्थला पूर्वीपासून ह्रदयरोगाचा त्रास होता की हे सारे अचानक घडले, याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत तरुणांमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या संशोधनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
2019 मध्ये अमेरिकन कॉलेज आफ कार्डियोलॉजी संमेलनात सादर करण्यात आलेल्या एका संशोधनात तरुणांमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत असल्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. यात गेल्या दहा वर्षांमध्ये 40 वर्षांखालील वयाच्या तरुणांमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढल्याचे संशोधन मांडण्यात आले होते. पुरुषांमध्ये 65 वर्षांनंतर व महिलांमध्ये वयाच्या 72 व्या वर्षानंतर ह्रदयरोगाचा धोका असतो. मात्र आता चाळीशीतील ह्रदयरोग चिंतेचे कारण बनला आहे.
व्यायाम करताना किंवा खेळताना पुरुषांना हार्ट अटॅक येणे सामान्य समजले जाते. पण ज्यांना पूर्वीपासून ह्रदयरोगाचा त्रास असतो त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनमधील तज्ज्ञांनुसार, चुकीच्या सवयी हार्ट अटॅकला निमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. धुम्रपानामुळे हार्ट अटॅकची शक्यता 8 टक्क्यांनी वाढत असते. उच्च रक्तदाब, हायपरकोलेस्ट्रोलेमिया आणि लठ्ठपणा सुद्धा कमी वयात ह्रदयरोगाचे कारण ठरतात.
अशी असतात लक्षणे
छातीत दुखणे, छाती दाटून येणे, अपचनामुळे छातीत जळजळ होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, खूप जास्त प्रमाणात भोवळ येणे, घाम फूटणे आदी ह्रदयरोगाची लक्षणे असल्याचे डॉक्टर सांगतात. बरेचदा यातील कुठलेही लक्षण पूर्वी कधीच नसले तरीही ह्रदयरोगाचा तीव्र धक्का येण्याची शक्यता असते.
कमी वयात हार्ट अटॅक नकोच
कमी वयात हार्ट अटॅक येऊ नये यासाठी आपली जीवनशैली सुधारावी लागणार आहे. एकतर आपल्याला देण्यात आलेली औषधे नियमीत घेतली पाहिजे. नियमीत व्यायाम आणि तणावापासून लांब राहणे, हे देखील केले पाहिजे.