नोएडा – पोलीस म्हणजे जनतेची मित्र असे म्हटले जाते. परंतु काही वेळा पोलीस हे सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी त्यांची लूट करतात, असाही अनुभव येतो. दिल्लीमध्ये एका युवकाला असाच अनुभव आला. त्याने फक्त पत्ता विचारला असता, पोलिसांनी त्याला चक्क दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
युवकाचा आरोप आहे की, रस्ता विचारल्यावर पोलिसांनी त्याला बदमाश समजून बाजूला घेत 2 हजार रुपयांची पावती दिली. याबाबत त्याने थेट पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेश सरकारकडे सोशल मीडियावर तक्रार करीत मदतीसाठी आवाहन केले आहे. मूळचा बिहारच्या नवादाचा रहिवासी असलेला राहुल रंजन हा एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक आहे. तो सध्या दिल्लीतील खानपूर येथे राहतो.
राहुल सांगितले की, त्याला एका ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी नोएडाला जायचे होते. त्यामुळे तो आपली बाईक घेऊन नोएडाला पोहोचला. मात्र जेव्हा तो सेक्टर 16 ए फिल्मसिटीसमोर पोहोचला तेव्हा तो रस्ता विसरला. यावर राहुलने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना पत्ता तथा योग्य रस्ता विचारला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडे चक्क 200 रुपयांची मागणी केली. राहुलने पैसे देण्यास नकार दिला आणि तो पुढे निघून गेला. परंतु काही अंतर गेल्यावरच त्याच्या मोबाईलवर दोन हजार रुपयांचे चालान कापण्याचा मेसेज आला.
पोलिसांनी त्याचे चालान कापले म्हणून त्याने तक्रार केली. आता राहुल म्हणतो की, तो पोलिसांकडे केवळ रस्ता विचारण्यासाठी गेला. आता मी सात दिवसात काम केल्यावर 2,000 रुपये कमवू शकेल, माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ट्विटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना टॅग करत याबाबत न्याय देण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी गणेश शहा यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.