कोची – राग किंवा संताप कोणती परिसीमा गाठेल तसेच त्याची परिणीती कशात होईल, हे सांगणे कठीण असते. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना कोल्लम जिल्ह्यात घडली आहे. व्हिडिओ पोस्ट केल्याचा राग आल्याने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला प्रियककाने जिवंत जाळले आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्लम जिल्ह्यातील आंचल भागात एक २८ वर्षीय महिला आपल्या प्रियकरा समवेत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होती. ते दोघे बराच काळ एकत्र राहत असल्याने त्यांना बाळही झाले होते. एकदा इन्स्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. कारण सदर महिला इन्स्टाग्रामवर वारंवार व्हिडिओ पोस्ट करायची. यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला, त्यानंतर हे प्रकरण वाढले.
एक दिवस इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यावरून या जोडप्यात बाचाबाची झाली. आणि भांडण सुरू असताना त्या प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीला रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यामध्ये ती गंभीररित्या भाजली. ही घटना समजताच आसपासच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ तिला तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तसेच दुर्घटनेत प्रियकराचे शरीर देखील ४० टक्के भाजले आहे. सध्या त्याच्यावर तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.