नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे सहाजिकच नैसर्गिक धबधबे खळाळले असून पर्यटकांचा तिकडे प्रचंड ओघ आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे अक्षरशः काही ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे येथे युवकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धबधबे आणि निसर्ग पर्यटन स्थळे असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. यामध्ये तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून जल्लोषा बरोबरच हुल्लडबाजीला देखील उधाण आलेले दिसून येते, त्यातच काही तरुण मद्यपान करून गैरवर्तन करतात यामधूनच दुर्दैवाने हाणामाऱ्या वाद विवाद आणि अपघाताच्या देखील घटना घडतात.
त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याच्या परिसरातील पहिणे या पर्यटन स्थळी दोन गटांमध्ये हाणामारी होऊन अनेक जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे त्यामुळे पोलिसांनी जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी घातली आहे. शहरापासून जवळच असलेल्या पहिणे परिसर दरवर्षी पावसाळ्यात गर्दीने फुलून जातो. येथील निसर्ग सौंदर्य, नेकलेस धबधबा नेहमीच पर्यटकांना आकर्षण ठरला आहे. मात्र मागील काही वर्षात हे ठिकाण सोशल मीडियामुळे अधिकच चर्चेत आले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच वाढली आहे.
पर्यटनामुळेच येथील स्थानिकांना रोजगार साधन उपलब्ध झाले. मात्र या सर्वांत हुल्लडबाजी देखील वाढली आहे. मद्यसेवन करून धिंगाणा घालणाऱ्या तरुण तरुणींची संख्याही वाढली आहे. परिणामी हाणामारी, मुलींची छेड हे प्रकार नित्याचे झाले आहे. एका ओढ्याच्या पाण्यात तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.
एकीकडे नाशिक शहरासह जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याला बहर आला आहे. मात्र दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करणारे देखील वाढत चालले आहेत. यामुळे पर्यटनाला येणाऱ्या इतर पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वन विभागाने बंदी घातलेली असताना देखील पावसाचा आनंद लुटण्यासाठी शनिवारी पहिणेत पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मात्र याचवेळी नेकलेस धबधब्यासमोर साचलेल्या तळ्यात अंगावर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरुन दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड गावचे तीन तरुण आणि नाशिकच्या सातपूरमधील पाच तरुणांमध्ये वाद झाला आणि काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
हा व्हिडीओ व्हायरल होताच वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या आठही जणांना रात्रीच ताब्यात घेत त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केली, दंगा माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पहिणे हे ठिकाण हाणामारीच्या घटना, तरुण-तरुणींची हुल्लडबाजी यामुळे अधिक चर्चेत येत असून यावर आळा बसवण्यासाठी वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे, यानंतर जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांसह धबधबे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी फिरकूच नका असे निर्देश पोलीस आणि वन विभागाने नागरिकांना दिले आहेत.
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1549058413971136512?s=20&t=0_BIVPDNZEO_s5OC8WJA2Q
नाशिक जिल्ह्यात निसर्ग सौदंर्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही ही पर्यटन स्थळे खुणावू लागली आहेत. यामुळे दरवर्षीं पावसाळ्यात राज्यभरातून हौशी पर्यटक पर्यटनस्थळांना भेटी देत असतात. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, वाघेरा हरसूल घाट, कश्यपी, पहिणे, इगतपुरीतील भावली डॅम परिसर आदी परिसरात हजारो पर्यटकांची गर्दी असते. विकेंडसह इतर दिवशी देखील गर्दीचा महापूर येत असतो. काही वर्षांत हुल्लडबाजी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त असूनही पर्यटकांना बंदी करण्यात येत आहे.
नाशिक शहर व परिसरात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पर्यटनस्थळांवर पर्यटन प्रेमींची गर्दी वाढली आहे. परंतु अतिवृष्टी आणि पर्यटनस्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय हुल्लडबाजी करणारे तरुण वाद विवाद करताना देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिक वन विभागाच्या पहिने, दुगारवाडी, हरिहर, भास्करगड, वाघेरा, भावली, ट्रिंगलवाडी, कुरुंगवाडी, अंजनेरी आदी पर्यटनस्थळे व गड किल्ल्यांवर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हौशी पर्यटक वर्षा सहलीच्या नावाखाली गडकिल्ल्यांच्या धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत अर्थात निर्बंध मुक्त झाल्यापासून नागरिकांचा उत्साह वाढणे स्वाभाविक आहे. परंतु यामुळे दुर्घटना वाढत असून साल्हेर किल्ल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अतिरेक थांबवण्यासाठी आता पोलिस आणि वन यंत्रणेने नागरिकांना तंबी दिली आहे. जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांसह धबधबे आणि धोकादायक ठिकाणी पर्यटनासाठी फिरकूच नका असे निर्देश देण्यात आले आहेत.
Youth Fighting Video Viral of Nashik Pahine Spot Police Action