अमृतसर – येथील श्री गुरु ग्रंथसाहिबच्या अपमानप्रकरणी श्री हरमंदिर साहिब येथे एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत तरुणाची ओळख पटू शकली नाही. याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने दावा केला की, श्रीगुरू ग्रंथ साहिबचे अपमान पाहून काही जण संतापले होते. त्यामुळे प्रचंड नाराजी पसरली होती. त्यातून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी श्री हरमंदिर साहिबच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री चन्नी यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.
एका प्रत्यक्षदर्शींने सांगितले की, एक तरुण गोंधळ घालत होता. तेव्हा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या टास्क फोर्सने आरोपी तरुणाला पकडून एका खोलीत नेले. तेथे त्याची चौकशी करण्यात आली, मात्र तो काहीच बोलत नव्हता. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याची सर्व बोटे तोडली. त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यादरम्यान तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा तेथेच मृत्यू झाला.
सोशल मीडियावर ही घटना पाहिल्यानंतर काही शीख जथेबंदींनीही एसजीपीसी कार्यालयाबाहेर निदर्शने सुरू केली. या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करून कायद्यानुसार शिक्षा व्हावी, असे काही जणांचे म्हणणे होते. डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, एक तरुणाने सचखंडच्या आत गेला. जिथे सर्व भाविक नतमस्तक होतात तिथे त्याने अचानक लोखंडी जाळी वरून उडी मारली. त्याने थेट श्री गुरु ग्रंथसाहिब चौथरा गाठला आणि समोर ठेवलेली किरपान उचलण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथील नोकरांनी त्याला पकडले. त्या तरुणाला तेथे एवढी मारहाण केली गेली की, त्याला सचखंडातून बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. आता सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.