नवी दिल्ली – जुनी वाहने भंगारात काढण्याच्या सरकारच्या नव्या धोरणांतर्गत जुन्या वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. वाहनांच्या मलकांना १५ वर्षे आणि त्यापेक्षा जुन्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी पुढील वर्षीच्या १ एप्रिलपासून पाच हजार रुपये अदा करावे लागणार आहेत. सध्याच्या दराच्या तुलनेत हा आकडा आठ पटीने जास्त आहे.
अधिसूचनेनुसार, १५ वर्षांपेक्षा जुन्या बस किंवा ट्रकच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी सध्याच्या व्यावसायिक वाहनांच्या मालकांच्या तुलनेत आठ पटीने अधिक शुल्क अदा करावे लागेल. सध्या १५ वर्षे जुन्या कारच्या नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क ६०० रुपये आहेत. आता ते ५ हजार रुपये द्यावे लागणार आहे.
जुन्या मोटरसायकलच्या नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क सध्या ३०० रुपये असून, आगामी काळात ते १ हजार रुपये असेल. त्याचप्रमाणे १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या बस किंवा ट्रकच्या नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क सध्या १ हजार ५०० रुपये आहे. पुढे ते १२,५०० रुपये होणार आहेत. मध्यम मालवाहतूक किंवा प्रवासी मोटर वाहनांसाठीचे शुल्क १० हजार रुपये असेल. आयात केल्या जाणार्या बाइक आणि कारच्या नोंदणी नूतनीकरणासाठी प्रत्येकी १० हजार आणि ४० हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
विलंब झाल्यास शुल्क
फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी ५० रुपये अतिरिक्त शुल्क लावले जाणार आहे. नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास उशीर झाल्यास खासगी वाहनांकडून प्रति महिना ३०० रुपये लावले जातील. व्यावसायिक वाहनासांठी ५०० रुपये अतिरिक्त शुल्क अदा करावे लागणार आहेत.