नवी दिल्ली – एकाच घरात राहणारे भाऊ-बहीण, भाऊ-भाऊ किंवा बहिणी-बहिणी हे वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. तसेच त्यांच्यातील हुशारीही सारखी नसते, असे म्हटले जाते. परंतु काही ठिकाणी मात्र वेगळे चित्र दिसून येते. दोन्ही भावंडे किंवा बहिणी हुशार असल्याने आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविताना दिसतात, याचाच प्रत्यय युपीएससी परीक्षेच्या निकालात दिसून आला आहे.
युपीएससी परीक्षेत 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात शुभम कुमारने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर जागृती अवस्थी दुसऱ्या आणि अंकिता जैन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, आयएएस टीना डबी यांची बहीण रिया डबी हिने या निकालात 15 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. मोठ्या बहिणी पाठोपाठ लहान बहिणीनेही या परिक्षेत यश मिळविल्याने परिवारात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, सर्वत्र या दोन्ही बहिणींची चर्चा होत आहे.
कोरोना काळात नागरी सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक उमेदवार निराश झाले. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी आपला संयम सोडला नाही आणि कठोर परिश्रमाने यश मिळवले. नवी दिल्ली येथे राहणाऱ्या रिया डबी हिने नागरी सेवा परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. तर रियाची मोठी बहिण टीना डबी सध्या राजस्थानमध्ये सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. त्यांनी 2015 च्या प्रशासकीय सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता.
आयएएस टीना डबी यांची धाकटी बहीण रिया डबीने सांगितले की, तिने लेडी श्री राम महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. पदवीनंतर तिने नागरी सेवांची तयारी सुरू केली. तिला मोठी बहिण टिना डबी हिची अभ्यासात मदत झाली. तिने घरी रोज १० तासांपेक्षा जास्त अभ्यास केला. रियाने सांगितले की, कोरोना कालावधीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली, तेव्हा एकवेळ मी निराशा झाली.
मोठ्या बहिणीने तिला समजावून सांगितले की, या दरम्यान तुला खूप मेहनत घ्यावी लागेल. तर परीक्षेत नक्कीच यश मिळेल. तसेच तिने ऑनलाईन कोचिंगची मदत घेतली आणि शेवटी यश मिळाले. या काळात मोबाईलचा वापर कमी झाला. मोबाईलचा वापर फक्त संभाषणासाठी केला जात होता. विविध अॅप्सचा वापर कमी करण्यात आला. तसेच रिया म्हणाली की, ही अतिशय प्रतिष्ठीत परीक्षा आहे. प्रत्येक उमेदवाराला यशस्वी व्हायचे असल्यास विद्यार्थ्यांनी निवांत अभ्यास करावा.