विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोविड लस घेण्यास इच्छुक असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील लोकांना कोविन वेबपोर्टलवर नोंदणी करणे आणि लसीकरणाचा वेळ घेणे बंधनकार करण्यात आले आहे. प्रारंभी लसीकरण केंद्रांवर नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु ४५ वर्षांच्या पुढील लोक लसीकरण केंद्रांवर नोंदणी करून लस घेऊ शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने १८ वर्षांहून अधिक वयाच्या सर्व लोकांचे १ मे पासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व लोकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लशीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गर्दी टाळण्यासाठी १८ ते ४५ वयाच्या लोकांना कोविन अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
इच्छुक नागरिकांसाठी कोविन आणि आरोग्य सेतू अॅपवर नोंदणीप्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. लसीकरण प्रक्रियेदरम्यान आधीचीच कागदपत्रे लागणार आहेत. सध्या केंद्राकडून लस घेऊन खासगी लसीकरण केंद्रे ती २५० रुपये प्रतिडोस देत आहेत. परंतु १ मेपासून ही व्यवस्था समाप्त होईल. खासगी केंद्रांनासुद्धा आता थेट लस उत्पादक कंपनीकडून लस खरेदी करावी लागणार आहे.
राष्ट्रीय कोविड लसीकरण धोरणानुसार, सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचार्यांना आणि ४५ वर्षांहून अधिकच्या लोकांना केंद्र सरकारकडून मोफत लस दिली जाणार आहे. खुल्या बाजारात, राज्य सरकारांना लशींचा पुरवठा करताना लस उत्पादकांना १ मेपूर्वी ५० टक्के किमतीची घोषणा करावी लागणार आहे. याच किमतीच्या आधारावर खासगी रुग्णालये, औद्योगिक प्रतिष्ठान उत्पादकांकडून लस खरेदी करू शकतील.