इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील वडोदरा येथे अनोखा विवाह होणार आहे. स्वतःशीच विवाह करण्याचा मानस व्यक्त करणाऱ्या क्षमा बिंदू या तरुणीच्या या कृतीला भाजपने विरोध केला आहे. तरुणीच्या विवाहाचे स्थळ मंदिर आहे. मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत भाजपने या विवाहाला विरोध केला आहे.
वडोदरामधील २४ वर्षीय क्षमा बिंदू ही तरुणी सर्व रीतीरिवाज पाळून स्वतःशीच विवाह करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. याबद्दल क्षमा बिंदू सांगते, की “माझ्या डोक्यात दीर्घकाळापासून हा विचार सुरू होता. परंतु हे शक्य होईल असा विचार केला नव्हता. नंतर मी सोलोगॅमीबद्दल वाचले. तेव्हा मी विचार केला की चला स्वतःशीच लग्न करू या.”
क्षमा बिंदू हिचा स्वतःशी ११ जून रोजी विवाह होणार आहे. त्याच्या तयारीसाठी पूर्ण उत्साहाने काम सुरू आहे. मंडप सजवण्यात येत आहे, सप्तपदीसाठी फेरे घेण्याची तयारी केली जात आहे. वरमाळ घालण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. परंतु या विवाहात वर नसेल, फक्त क्षमा बिंदू ही वधू असेल. या पद्धतीला सोलोगॅमी असे म्हणतात. एखादी तरुणी स्वतःशीच विवाह करण्याचे हे गुजरातसह देशातील हे पहिलेच प्रकरण आहे.
क्षमा हिला विवाह करण्याची इच्छा नव्हती. परंतु वधू होण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. क्षमा सांगते, की “देशात कोणी स्वतःशी लग्न केले आहे का, याबद्दल मी ऑनलाइन सर्च केले. पण असे कोणीच केले नव्हते. असे लग्न करणे म्हणजे स्वतःबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार आहे. मी स्वतःशीच प्रेम करते, त्यामुळे स्वतःशीच लग्न करणार आहे.” असा विवाह करणारी ती पहिलीच मुलगी ठरणार आहे. क्षमा एका खासगी कंपनीत नोकरी करते.
भारतात सोलोगॅमीचे हे पहिलेच प्रकरण आहे. परंतु पाश्चिमात्य देशांमध्ये हा ट्रेंड सुरू होऊन अनेक वर्ष झाले आहेत. १९९३ साली अमेरिकेत लिंडा बारकर यांनी स्वतःशी लग्न केले होते. त्या विवाह सोहळ्यात त्यांनी ७५ पाहुण्यांना आमंत्रित केले होते. विवाहाचे सर्व विधी केले होते.