– राजेंद्र राजधर
आज जर बघितले तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना सारख्या रोगाने थैमान तर घातलेच आहे सोबतच शारीरिक व मानसिक असे अनेक आजार मनुष्याला त्रस्त करीत आहेत. लोकांची मानसिकता बिघडत चाललेली दिसते. अशा परिस्थितीत समाजाला राजयोग मेडिटेशन ची खूप आवश्यकता आहे याद्वारे आपण आपल्या मनावर नियंत्रण करू शकतो, सोबतच समाजामध्ये परिवर्तनाची एक क्रांती सुद्धा घडवू शकतो याच राजयोगाचा प्रयोग आम्ही शेतीवर सुद्धा करून बघितले आहेत. यातून योगिक शेती ही संकल्पना पुढे येऊन त्याला एक सुव्यवस्थित रूप देण्याचे कार्य आमच्या ग्राम विकास प्रभागा ने केलेले आहे. हाच धागा पकडून आता आम्ही 23 एप्रिल 2022 रोजी प्रमिला लॉन्स पिंपळगाव बसवंत येथे सकाळी साडेनऊ वाजता भव्य आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्या मधून नक्कीच शेतकऱ्यांना व समाजाला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमासाठी खास माउंट आबू येथून आमच्या ग्राम विकास प्रभागाचे मुख्यालय समन्वयक ब्रह्माकुमार राजू भाई उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच पुणे येथून ग्राम विकास प्रभागाचे राष्ट्रीय समन्वयक राजयोगिनी सुनंदा दीदी व क्षेत्रीय समन्वयक राजयोगी ब्रह्माकुमार दशरथ भाई इत्यादी संस्थेचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच सोबत प्रमुख वक्ता म्हणून कृषी मूल्य नीती आयोगाचे माजी सदस्य व मा. आमदार श्री पाशाभाई पटेल, कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, इचलकरंजी येथून कृषी तज्ञ बाळासाहेब रूगे, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार दिलीप काका बनकर यांची सक्रीय उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात उपस्थितांना स्नेहभोजनाचा सुद्धा लाभ होणार आहे. यामुळे हा कार्यक्रम अतिशय फलदायी व आपल्या सर्वांच्या उपयोगितेचा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी दि. १८ एप्रिल रोजी पंचवटी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी सांगितले कि, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्याची संकल्पना मांडली होती. त्यांना असा समाज अपेक्षित होता जिथे सर्वजण सुख-शांती आनंदी असतील आपसामधे बंधुभाव, स्नेहा असेल खुशहाली असेल. समाजात सर्वत्र संपन्नता असेल, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत मात्र असा संकल्पित भारत आपल्याला कुठेच दृष्टिक्षेपात दिसत नाही. मात्र प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया तर्फे समाजाला नवसंजीवनी देण्याचे कार्य होत आहे. ब्रह्माकुमारी संस्थेचे मुख्यालय माउंट आबू राजस्थान येथे असून देश विदेशातील १३५ देशांमधील साडेचार हजार पेक्षा अधिक सेवा केंद्रांमधून लोक जागराचे हे कार्य 1936 पासून निरंतर सुरू आहे.
संस्थेचे साकार संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी लावलेल्या रोपट्याचे आज मोठा वृक्ष झाला आहे. अध्यात्मिक नैतिक सामाजिक मानवी मूल्यांची जपणूक व संवर्धन व जागृती साठी मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक क्रांती केली जात आहे. चालू असलेल्या मानवतेच्या या महायज्ञात आता भारत सरकारने सुद्धा सहभागिता दर्शवली आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मकुमारी संस्थेने नुकतेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे… या संकल्पनेवर आधारित प्रोजेक्टचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संस्थेच्या माउंट आबू मुख्यालयात एका भव्य कार्यक्रमात केले आहे. या द्वारे देशभर अध्यात्मिक संदेश पोहोचवण्याचे कार्य ब्रह्माकुमारी संस्था करणार आहे.
याच शृंखलेत नाशिक झोन तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे… या संकल्पनेवर आधारित नाशिककर शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी विशेष आत्म निर्भर शेतकरी मेळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे दिलीप भाई यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या व आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करतांना ब्रह्माकुमार बाळासाहेब सोनवणे यांनी सांगितले कि आजही आपल्या देशात 70 टक्के लोक खेड्यात राहतात आणि खेड्यातून असलेला एकमेव प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती हाच होय. आज आपली 70 टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. आजही कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ च्या दृष्टचक्रात भारतीय शेती व शेतकरी सापडला आहे. अशावेळी आपला शेती हा परंपरागत व्यवसाय फक्त उदरनिर्वाह पुरता न राहता आता शेतकरी बांधवांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. शेती आणि शेतकऱ्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे याकरता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे आत्मनिर्भर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात पर्यावरणाचा ह्रस न होता नैसर्गिक रचनेचा आधार घेऊन केलेला शेती व्यवसाय हा मानवाचे अखंड कल्याण साधण्यास कसा उपयुक्त होऊ शकतो, रासायनिक खतांचा विविध कीटकनाशकांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात शेती विषयुक्त झाली आहे ती विषमुक्त शेती कशी करता येईल याचा उहापोह या मेळाव्यात तज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. राबराब राबणारा माझा शेतकरी बांधव शेतीतून उत्पन्न मिळाले नाही त्यामुळे कर्जाचा बोजा वाढलातर काही वेळा आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करतटोकाची भूमिका घेतो असे घडू नये याकरिता राज योगाच्या अभ्यासाने त्याची मन शांती व्हावी तोच या विचारापासून परावृत्त व्हावा याकरिता या शिबिरातून राज योगाच्या अभ्यासाचे महत्त्व यातील तज्ञ मार्गदर्शक वक्ते देतील आणि याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधव घेतील योगिक शेती शाश्वत विकासाची नवी दिशा या विषयावरील वक्त्यांच्या मार्गदर्शनातून शेतकरी राजाचे जीवन समृद्ध होण्यास मदत होणार आहे. असेही बाळासाहेब यांनी सांगितले.
मेळाव्याची कार्ययोजना स्पष्ट करतांना ब्रह्मा कुमारी पुष्पा दीदी यांनी सांगितले कि या मेळाव्याचा लाभ सर्व स्थरातील शेतकऱ्यांनी घ्यावा या साठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील अधिकारी यांची भेट घेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांना आमच्या कॉलिंग कमिटी तर्फे संपर्क केला जात आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील गाव गावांमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. निफाड तालुका व शेजारीतालुक्यातील असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती उपसभापती संचालक मंडळ आणि सचिव यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या माध्यमातूनशेतकऱ्यांपर्यंत मिळाव्या विषयी माहिती देण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. या सोबतच बॅनर्स स्टिकर्स पेम्प्लेट्स गावोगावी वाटपचे कार्य होत आहे. मोबाईल द्वारे स्टोरी मेसेजेस व्हॉइस मेसेज पाठवले जात आहे. या विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिंपळगाव बसवंत तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये साऊंड सिस्टिम असलेली भोंगा गाडी फिरवत त्याद्वारे मेळावे यासंबंधी माहिती दिली जात आहे.