इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावती:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सोमवारी खर्गे यांनी योगी यांच्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणांचा खरपूस समाचार घेत दहशतवाद्यासारखी भाषा म्हटले होते. आज अचलपूर येथील निवडणूक सभेत योगी यांनी पलटवार केला. हैदराबादच्या निजाम आणि रझाकारांच्या माध्यमातून योगी यांनी खर्गे यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अत्याचाराचाही त्यांना विसर पडल्याचे सांगितले.
खर्गे यांच्या विधानाचा संदर्भ देत योगी म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष खर्गे माझ्यावर नाराज आहेत. योगींसाठी देश प्रथम येतो. माझे नेते मोदी यांच्यासाठी देश प्रथम येतो; पण काँग्रेसचे तुष्टीकरण तुमच्यासाठी सर्वोपरि आहे. खर्गे यांचे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते. भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तेव्हा मुस्लिम लीगसह काँग्रेसचे नेतृत्व गप्प होते. त्यामुळेच मुस्लिम लीग त्या वेळी निवडकपणे हिंदूंना मारत होती. या आगीत खर्गे यांचे गावही जळून खाक झाले, त्यात त्यांची आई आणि त्यांचे कुटुंब मरण पावले, कारण त्यांनी तसे सांगितले तर त्यांना माहीत आहे, की त्यामुळे मुस्लीम मते निसटतील, व्होटबँकेसाठी तो आपल्या कुटुंबाचा त्याग विसरले.’’