विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात चर्चा सुरू आहे. याबाबतीत वेळोवेळी कठोर कायदेही करण्यात आले. मात्र तरीही जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताचे स्थान कायम आहे. आता उत्तर प्रदेशात योगी सरकारने यासंदर्भात नवा कायदा आणण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ‘दो बच्चे ही अच्छे` हा संदेश घराघरात पोहोचविला जाणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे हे अभियान २७ जूनपासून सुरू होणार आहे. पुढील महिनाभर हे अभियान सुरू राहील. याअंतर्गत २७ जून ते १० जुलै या कालावधीत दाम्पत्य संपर्क पंधरवाडा चालेल आणि ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या नियंत्रण पंधरवाडा सुरू होईल. पहिल्या पंधरवाड्यात आशा वर्कर आपापल्या क्षेत्रातील दाम्पत्यांची नावे निश्चित करतील.
दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन केले जाईल. तर नवदाम्पत्यांना ‘हम दो हमारे दो‘से क्या लाभ है, याबाबत माहिती दिली जाईल. त्यांना कुटुंब नियोजनाच्या संदर्भात कोणत्या सुविधा मिळत आहेत, हेदेखील सांगितले जाईल. पात्र लोकांना दोन महिन्यांसाठी गर्भनिरोधक गोळ्या व कन्डोम मोफत दिले जातील. पुरुष व महिला दोघांनाही नसबंदीसाठी पूर्वनोंदणीची सुविधा दिली जाईल.
मोबाईल व्हॅन फिरणार
लोकसंख्या नियंत्रण पंधरवाड्यात प्रचारासाठी मोबाईल व्हॅन गावागावांमध्ये फिरेल आणि कुटुंब नियोजनाची माहिती देईल. ११ जुलैपासून सुरू होत असलेल्या या पंधरवाड्याची तयारी पूर्ण झाली आहे. दोन मुलांमध्ये कमीत कमी तीन वर्षांचे अंतर ठेवण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. लाभार्थ्यांना गर्भनिरोधक इंजेक्शन घेण्यासाठी विशेषत्वाने प्रेरित केले जाईल. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनजागृतीसाठी जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
कायदा येणार
उत्तर प्रदेश राज्य विधी आयोगाने राज्य लोकसंख्या नियंत्रणासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या राजस्थान आणि मध्यप्रदेशातील कायद्याचा अभ्यास सुरू आहे. शिवाय योगी सरकार धान्य व इतर सबसिडीमध्ये कपात करण्याच्या विविध पैलूंवर विचार करीत आहे. बेरोजगारी व उपासमारीसारख्या गंभीर प्रश्नांचा विचार करून योगी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे.