राज्य केमिस्ट असोसिएशन (सेंट्रल झोन) उपाध्यक्ष योगेश बागरेचा यांची विशेष मुलाखत
नाशिक: आज सगळ्याच क्षेत्रात ऑनलाइन व्यवसायाचे पेव फुटले आहे. पण केमिस्ट व्यवसायात ऑनलाइन व्यवसाय हा भविष्यासाठी धोक्याची घंटा देणारा आहे. ऑनलाइन औषधे येताना ती चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद अशी कुठूनही येऊ शकतात ते आपल्याला कळत नाही. पण मध्यंतरी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सरकारला असे अनेक गोडाऊन सापडले की तिथे एक्सपायरी डेट गेलेल्या औषधांवर लेबलिंग करण्याचे काम सुरू होते. आणि ऑनलाइन माध्यमातून असे औषध तुमच्यापर्यंत येऊ शकते. अशी औषधे खाल्ली तर पेशंटच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे ऑनलाइन केमिस्ट व्यवसाय हा धोकादायक आहे असे मत महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन (सेंट्रल झोन) उपाध्यक्ष योगेश बागरेचा यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण आयोजित फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. ते पुढे म्हणाले की, आज केमिस्ट व्यवसायातही कॉर्पोरेट क्षेत्राने पदार्पण केले आहे. त्यांच्याकडे चांगले भांडवल आहे आणि त्यांच्या पॉलिसीनुसार या क्षेत्रात येऊन कमी किमतीत औषधे द्यायची, डिस्काउंट ऑफर द्यायची आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करायचे. यामुळे काही वर्षात जे परंपरागत केमिस्ट व्यावसायिक आहेत ते बाजूला होतील आणि एक मोनोपॉली तयार होईल. या जीवघेण्या स्पर्धेमुळे परंपरागत व्यावसायिक संपून गेला आणि मूठभर लोकांच्या हातात हा व्यवसाय गेला तर भविष्य काय राहील याचा विचार ग्राहकांनी करणं गरजेचं आहे. आज अनेक ग्राहकांचे केमिस्ट व्यवसायिकांशी वर्षानुवर्षाचे चांगले संबंध आहेत.
आज आपल्याला ऑनलाइन सेवा, डोअर टू डोअर सेवा फायदेशीर, सोयीची वाटते. पण कालांतराने हेच लोकं सर्व्हिस चार्जेस लावतील, डिस्काउंट न देता एमआरपीवर औषधे विकतील, तेव्हा धोका लक्षात येईल. ऑनलाइन व्यवसायतला धोका सांगताना त्यांनी सांगितले की, समजा घरात एखादा पेशंट आहे. अचानक त्याला काही त्रास झाला तर आपल्या नेहमीच्या मेडिकल मधून आपण पटकन औषध आणू शकतो पण हेच ऑनलाइन मागवत बसलो तर त्याला यायला वेळ लागेल. एखादं औषध बदलायची वेळ आली तर आपण मेडिकल मधून बदलू शकतो. त्यामुळे आपल्या केमिस्टच्या मागे उभे राहा त्यांना पाठिंबा द्या, असा सल्ला त्यांनी ग्राहकांना दिला.
केमिस्ट असोसिएशन विषयी सांगताना ते म्हणाले की, केमिस्ट व्यावसायिकांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी एकत्र येऊन मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणे हा आमचा मूळ उद्देश आहे. केमिस्ट व्यावसायिकांच्या अनेक समस्या आहेत. आम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट लागू आहे. या कायद्यानुसार आम्ही सगळे काम करतो. पण तरीही मध्यंतरी मेडिकल मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला असोसिएशनने विरोध केला. जे ग्राहक येतात ते कोणत्याही प्रकारचे नशेचे औषधे घेतात का यावर लक्ष ठेवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला होता. पण व्यावसायिकाच्या दृष्टीने हे अन्यायकारक आहे. खरेदी विक्रीचा सगळा लेखाजोखा आमच्याकडे असतो आणि वेळोवेळी तो आम्ही सादर करतो. व्यवसायिकाप्रमाणे ग्राहकांच्या समस्यांसाठी सुद्धा असोसिएशन खंबीरपणे उभी आहे. कोणत्याही ग्राहकाला एखाद्या केमिस्ट विषयी अडचण असेल तर ते असोसिएशनकडे मदत मागू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.