नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व सहभागात साजरा करण्यात आला. विद्यालय प्रांगणात सकाळी ६:५० वाजता योग सत्रास प्रारंभ झाला आणि सलग दोन तास चाललेल्या या सत्रात ५०० विद्यार्थी आणि ६० शिक्षक सहभागी झाले.
सत्राची सुरुवात सोप्या वार्मअप व्यायामाने झाली आणि त्यानंतर विविध आसन व प्राणायाम तंत्रांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी हंडगे, गर्गी, सिद्धांत शर्मा, उत्कर्ष पाटील आणि इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीतबद्ध योग सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमात कन्या ऋद्धी शिंदे हिने योग दिनाचे महत्त्व विषद करणारे प्रेरणादायी भाषण दिले. तिने योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य कसे सुदृढ राहते हे सांगितले.
संपूर्ण योग सत्र श्रीमती राजेश्री वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या श्रीमती सोनिया जैन व उपप्राचार्या श्रीमती ममता राणी यांचे सत्रास मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आरोग्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासाचा संदेश प्रभावीपणे दिला गेला.