मुंबई – गेल्या काही दिवसांमध्ये नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांचा हंगाम पाहता खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. या भागात आता येस बँकेने गृहकर्जाच्या व्याज दरात कपात केली असून कर्जाची परतफेड करण्याची कमाल कालावधी 35 वर्षे निश्चित केली आहे.
सहसा, ग्राहकांना जास्तीत जास्त 30 वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्जाची परतफेड करण्याची संधी मिळते. परंतु सणासुदीच्या काळात, येस बँकेने ‘येस प्रीमियर होम लोन’ ऑफर सुरू केली आहे. या अंतर्गत, बँक आता केवळ 6.7 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नोकरदार महिलांना व्याजदरावर 0.05 टक्के अतिरिक्त सवलत मिळेल. त्यामुळे पगारदार महिला 6.65 टक्के व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतील.
बँकेच्या या ऑफर अंतर्गत पगारदार असलेले गृह खरेदीदार कमीत कमी कागदपत्रांसह गृह कर्ज घेऊ शकतात. याशिवाय, कर्जाचा ईएमआय भरण्याचा पर्याय देखील 35 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी दिला जाईल. सदर ऑफर नवीन खरेदीदारांसोबत बॅलन्स ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांनाही उपलब्ध असेल. ही ऑफर दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत म्हणजे 90 दिवसांसाठी आहे.
तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या काळात घर खरेदीची मागणी वाढेल. बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देखील सुरू केल्या आहेत. व्याजदर कमी करण्याबरोबरच अनेक बँकांनी ग्राहकांच्या सिबील स्कोअरच्या आधारे कर्जाची मर्यादा निश्चित करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर काही बँकांनी प्रक्रिया शुल्कामध्ये सूट देण्याबाबत बोलले आहे.