नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या येवला शिवसृष्टीचे सोमवार दि.२ मे २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात येणार आहे.
येवला हे ऐतिहासिक, धार्मिक व औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे शहर असून महाराष्ट्राचे महावस्र पैठणीची निर्मिती याच शहरात होते. थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती तात्या टोपे यांची येवला ही जन्मभूमी असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा याच येवले शहरात केली. पैठणीमुळे येवल्याची जगभर ओळख झाली असून पर्यटनासाठी अनकाई किल्ला त्याचप्रमाणे कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, बोकटे येथील कालभैरव मंदिर, अंदरसूल येथील नागेश्वरी मंदिर हे प्रसिद्ध स्थळे येथे आहेत. येवला शहराच्या लौकीकात आणखी भर पडण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला शहरातील शिवसृष्टीसाठी आतापर्यंत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून २ कोटी तर प्रादेशिक पर्यटन योजनेतून ४ कोटी अशा एकूण ६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. येवला शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीचा सर्व्हे न.३८१२ गट नं. १०० ब मधील २ एकर भूखंड देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिवश्रुष्टी साठी हस्तांतरित करण्यात आला आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाचे भव्य दिव्य असे स्वरूप असून यामध्ये सुशोभीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण विषयक अभ्यास, सुसाध्यता, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींचा विचार करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे,ऑडिओ व्हिडिओ हॉल,शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन,पुस्तक व साहित्य विक्री केंद्र,माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी,वाहनतळ,शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी, स्वच्छतागृह व उपहारगृह, परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण इत्यादी कामे करण्यात येणार आहे.