येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला उपविभागाचे तात्कालीन प्रांताधिकारी सोपान कासार यांची महिला तलाठ्याने केलेल्या विनयभंगाच्या आरोपातून येवला वरिष्ठ स्तर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रत्यक्ष उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या विनयभंगाच्या या आरोपाच्या प्रकरणा मुळे संपूर्ण राज्यसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
सोपान कासार हे २०२१ मध्ये येवला महसूल उपविभागात प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी तालुक्यातील सायगाव येथील महिला तलाठी यांनी कासार यांनी विनयभंग केल्याची तक्रार येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये १६ ऑगस्ट २०२१ मध्ये दाखल केली होती. या तक्रारीवरून प्रांताधिकारी कासार यांचे विरुद्ध भादंवि ३५४ अ व ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपण बदलीस पात्र नसतानाही प्रांताधिकारी कासार यांनी ज्येष्ठतेचे नियम डावलून नांदगाव तालुक्यात बदली केली होती. ही बदली रद्द करण्याच्या बहाण्याने प्रांतधिकारी कासार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीमध्ये संबंधित तलाठी महिलेने केला होता.
येवला वरिष्ठ स्तर न्यायालयात मध्ये या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एम.एस लिगाडे यांचे समोर झाले. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासले .या प्रकरणाचा तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे यांनी केला. प्रांताधिकारी सोपान कासार यांच्या वतीने अॅड. शंतनु कांदळकर व अॅड. राहुल कासलीवाल यांनी बाजू मांडली.