येवला – एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर नागरिकांची फसवणूक करुन त्यांचे पैसे लंपास करणा-याला पोलीसांनी गजाआड केले आहे. संशयित सनिदेवल विष्णू चव्हाण (वय २०, रा. मुद्देश वडगाव ता. गंगापूर) हा मंगळवारी येवला शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी शहरातील विविध ठिकाणी सापळा लावला. गंगादरवाजा भागात सदर संशयित दिसताच पोलिसांनी शिताफीने त्यास अटक केली. त्याचेकडून विविध बँकाचे आणि ग्राहकांचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले.
एटीएम केंद्रात जाऊन चव्हाण वयस्कर नागरिकांचा अजाणतेपणाचा फायदा घेऊन हातचलाखीने कार्डची अदलाबदल करून एटीएममध्ये पैसे काढत होता. पोलीसांनी या सराईत चोराच्या शोधासाठी विविध एटीएम केंद्रातील सीसीटीवी फुटेज वरून तपास सुरू केल्यानंतर त्यांना या गुन्ह्याचे धोगेदोरे मिळाले. त्यानंतर पोलीसांनी सापळा लावून चव्हाण याला गजाआड केले.
असे काढायचा पैसे
चव्हाण हा एटीएमजवळ उभा राहायचा. येथे वयस्कर नागरिकांना मदतीच्या बहाण्याने त्यांना पैसे काढून देतो असे सांगायचा. त्यानंतर त्यांच्याकडून पिन नंबर घ्यायचा. त्यानंतर पैसे येत नाही असे सांगून कार्ड बदलून घ्यायचा. त्यांना दुस-या एटीएममध्ये जा असा सल्ला देऊन स्वत. पैसे काढून घ्यायचा.