अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील चिचोंडी येथील घोटेकर वस्ती येथे घोटेकर कुटुंबात दुसर्या पिढीनंतर जन्मलेल्या मुलीचे घोटेकर कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले आहे. विशेष म्हणजे ४० वर्षांनंतर घोटेकर कुटुंबियांच्या घरांमध्ये जिजाऊच्या लेकीचे आगमन झाले असून यानिमित्ताने कुटुंबाने वृक्ष वाटप करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एरवी नकोशी असलेल्या लेकीला गर्भपात करून तिला जगात येण्यापूर्वीच मारले जाते. अनेक ठिकाणी मुलींचा जन्म झाला म्हणून नवजात अर्भकाला फेकून दिले जाते. या सर्वांना घोटेकर कुटुंब अपवाद ठरले आहे मुलीचे आजोबा रघुनाथ रेवजी घोटेकर यांना दोन्ही मुलच झाली होती. आपल्याला मुलगी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र यासाठी त्यांना ४० वर्ष वाट पहावी लागली आहे. पण, या आनंदात आजोबाने चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर मुलीचे फटाके फोडून जोरदार स्वागत केले. तसेच ४० महिलांना एकत्र बोलावून त्यांना फळझाडांच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण बचाव आणि बेटी बचावचा संदेश देखील दिला आहे.