अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शहरात एका खासगी कंपनीच्या फुड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या मनोज वीरचंद शिंगी (वय ३८) रा. पारेगाव रोड येवला या तरुणाला दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्यात अडवून लूट करून त्याला बेदम मारहाण केली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत मध्ये लुट झालेल्या तरुणाला ११ टाके पडले असल्याची माहिती मिळाली आहे.
मनोज शिंगी हे रात्री दहा वाजता फूड कंपनीची ऑर्डर घेऊन कांदा मार्केट समोरील पाटोदा रस्त्यावर जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी थांबून ते आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलत असताना तेथे आलेल्या दोघा इसमांनी मनोज शिंगी या फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. त्याच्या ताब्यातील ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ८ हजार २०० रुपये रोखे असे एकूण १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी मनोज शिंगी यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले यानंतर चोरटे पसार झाले. मनोज सिंगी यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे हे करत आहेत.