अजय सोनवणे
येवला – शहरात आणि तालुक्यातील काही भागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून,यात नागरिकांना जखमी करण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे,मागील चार-पाच दिवसापूर्वी तांदुळवाडी फाट्याजवळ ऐका कुत्र्याने ७ जणांना चव घेत जखमी केलेली घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास येवले शहरातील आमेना नगर भागात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घालत चार मुलांना गंभीर चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार मुलांसह एकूण ९ जण जखमी झाले आहे. त्यात चारही मुलं गंभीर जखमी झाली असून उमैमा फैज सौदागर, फायका शिराज कुरेशी, एखलाक इकबाल अन्सारी अशी त्यांची नावे असून येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या अंगावर धावून जाणे,त्यांना चावा घेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.