येवला – सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केल्यानंतर व्यापारी खळ्यावर कांद्याचे रोख पैसे मागितल्याच्या कारणावरून ममदापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षय भाऊसाहेब गुडगे यांना कांदा व्यापारी रामेश्वर अट्टल यांनी अरेरावीच्या भाषेत दमदाटी केली होती. त्यांच्या माणसांनी गुडघे यांना मारहाण केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव यांच्या दालनात कांदा उत्पादक शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी कांदा उत्पादक शेतकरी अक्षय गुडघे हेही उपस्थित होते.
येवल्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला मारहाण व दमबाजी हे एक उदाहरण असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वेळीच वाचा फोडली नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दमबाजी व मारहाणीचे प्रकार सर्रास होत राहतील म्हणून याविरोधात आवाज उठवण्यासाठी व अक्षय गुडघे यांची संबंधित कांदा व्यापाऱ्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी बाजार समितीच्या कार्यालयामध्ये हे आंदोलन केल्याचे संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.
एकीकडे ठीय्या आंदोलन करत असतानांही बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार नाही अशी भूमिका कांदा संघटनेने घेतल्याने कांदा लिलाव सुरू झाले. परंतु कांदा व्यापारी अट्टलल यांनी लिलावात सहभाग न घेतल्याने व त्यांनी लिलावात सहभाग घेऊ नयेत यासाठी बाजार समितीने त्यांना अप्रत्यक्ष मदत केल्याने उर्वरित कांदा व्यापारी यांनी कांद्याची कमी दरात लिलाव करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः होऊन लिलाव बंद पाडून त्यांनी बाजार समिती कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी कांद्याचे लिलाव कुठल्याही परिस्थितीत बंद झाले नाही पाहिजे तसेच आज जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उंच व सरासरी जी निघाली या भावात येवला बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करावा अशी भूमिका दिघोळे यांनी घेतली. अट्टल हे रविवारी कांदा उत्पादक शेतकरी अक्षय गुडगे यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागतील अशी ग्वाही बाजार समितीचे सचिव, संचालक चंद्रकांत शिंदे, शरद लहरे यांनी दिल्याने व ती अक्षय गुडघे यांनी मान्य केल्याने आजचे ठीय्या आंदोलन स्थगित केल्याचे दिघोळे यांनी घोषित केले. यावेळी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, नांदगाव युवा तालुकाध्यक्ष सोमनाथ मगर, कार्यकारिणी सदस्य दिगंबर धोंडगे, मुन्ना पगार, भाऊसाहेब शिंदे, युवराज वाघ, कांदा उत्पादक शेतकरी नागेश जगताप, दशरथ भागवत, प्रवीण शिंदे, अनिल आंधळे यावेळी उपस्थित होते.
निंदनीय प्रकार
कांदा उत्पादक शेतकरी आता संघटित होत असून येवला बाजार समितीत कांदा उत्पादक दमबाजी व मारहाणीच्या घडलेल्या या निंदनीय प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून कांदा उत्पादकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून येणाऱ्या काळामध्ये राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये बाजार समिती प्रशासन व व्यापारी यांच्याकडून कांदा उत्पादकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून अनुचित प्रकार घडणा-या बाजार समितीच्या बरखास्तीची मागणी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येईल.
भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष
राज्य कांदा उत्पादक संघटना