येवला – रेंडाळे गावा नजिक असलेल्या पीर बाबा मंदीरा जवळ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उन्हाळ्यात हरणांचे कळप पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. पाण्यासाठी मानवी वस्तीकडे आलेल्या हे हरण भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला. या परिसरातील वनविभागाने हरणांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक प्राणी प्रेमी
प्रविण आहेर यांनी केली आहे. येवला तालुक्यात हरणांची मोठी संख्या नगरसूल परिसरात आहे. या पूर्व भागात सध्या उन्हामुळे पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याच्या शोधात हरणांचे कळप हिंडत असतात. आज सकाळच्या सुमारास पाण्यासाठी भटकंती करीत असतांना ही घटना घडली.