येवला – हार्डवेअर दुकानात काम करणार्या नोकरांनी तब्बल नऊ लाख रुपयांचा माल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरीप्रकरणा दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरी प्रकरणी मुकुंद जगन्नाथ मिसाळ यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, दुकानात जय सुनील जोंधळे व माजिक शेख (दोघेही राहणार येवला) हे अनेक वर्षांपासून कामाला होते. माझे शहरात विविध ठिकाणी गोडावून आहेत. या गोडाऊनमध्ये ठेवलेले ४६ हजार ८७५ रुपये किंमतीचे जीआय टायर बंडल, १६,२०० रुपये किंमतीचे लोखंडी जाळी बंडल , ६००० रुपये किंमतीच्या प्लास्टिक गोण्या, ११२०० रुपये किंमतीच्या एलडी प्लास्टिक बांगडी पाईप मुरघास बॅग, ४००० रुपये किंमतीचे प्लास्टिक सिलींग मशीन, तसेच २४०० रुपयांचा ऐवज असा एकूण नऊ लाख ६ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल कामावर असलेल्या दोघा नोकरांनी चोरून नेला. हा चोरलेला माल त्यांनी शहरातील विविध ठिकाणी विकला. या सर्व चोरीच्या प्रकाराची कबुली या दोन्ही नोकरांनी दिली आहे. येवला शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८०, ५५४, ३८१ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.