येवला – येवला तालुक्यातील रेंडाळे येथील शेतकरी नवनाथ रामचंद्र आहेर यांच्या शेततळ्यात पडून हरणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजापूर, ममदापुर,भारम, राहाडी,रेंडाळे आदी गावात हरणाचा कायम अधिवास आहे. तसेच हे क्षेत्र हरणांसाठी राखीव आहे. मात्र वनविभाग या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असा येथील नागरिकांचा कायम रोष आहे. उन्हाळाची चाहूल लागताच हरणांची अन्न पाण्यासाठी मानवी वस्ती कडे धाव घेतात. मात्र अनेकदा त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागते. कधी विहिरीत पडून तर कधी विना अन्न पाण्याने हरीण मृत पावतात. येथे वन विभागाच्या वतीने हरणांसाठी पाण्याचे कृत्रिम तलाव केलेले आहेत. मात्र त्यात कधीतरी पाणी भरतात तसेच हा भाग कायम अवर्षण ग्रस्त असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून या भागात टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. त्यात आज पाण्याच्या शोधार्थ असलेले हरीण आहेर यांच्या शेत तळ्यात बुडून मृत पावले. आता तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यां जाग येईल का असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहे.