नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पासोबत येवला तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, चिचोंडीसह निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील पर्यटन विकासाची ८ कोटीची कामे मंजूर झाली आहे. लवकरच येवला शिवसृष्टीसह विविध पर्यटन विकासाच्या कामांना सुरुवात होणार आहे.
येवला मतदारसंघात येवला शिवसृष्टी प्रकल्पासह विविध पर्यटनाच्या विकास कामासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार येवला मतदारसंघातील पर्यटनाच्या विविध विकास कामांसाठी ८ कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये येवला शहरात उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडींचे दगडात कोरीवकाम केलेले चित्रशिल्प, पुतळ्यासाठीचा चौथरा, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी, शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पेस्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी, स्वच्छतागृह व उपहारगृह, परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण इत्यादी कामे करण्यात येणार आहे.
तसेच येवला तालुक्यातील अंदरसुल नागेश्वर मंदिर येथे नदीकिनारी घाट व सांस्कृतीक भवन बांधणे, पोहच रस्त्याची सुधारणा करणे, प्रवेशद्वार करणे व रस्त्याचे मजबुतीकरण व सुशोभिकरण करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, नगरसुल खोलेश्वर महादेव मंदिर येथे नदीकीणारी घाट बांधणे व सुशोभिकरण करण्यासाठी ५० लक्ष, चिचोंडी हनुमान मंदिर देवस्थान येथे शुशोभिकरण करण्यासाठी १० लक्ष तर निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे श्रीक्षेत्र नक्षत्रवनात सिमेंट रस्ते करण्यासाठी १५ लक्ष, खेडलेझुंगे येथे श्रीक्षेत्र नक्षत्रवनात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १५ लक्ष, खेडलेझुंगे येथे नदीलगत घाट बांधण्यासाठी ५० लक्ष असा एकूण ८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या पर्यटन विकास कामांमुळे पर्यटनाला अधिक वाव मिळणार आहे.