नाशिक – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात विंचूर व येवला येथील चिचोंडी येथे औद्योगिक वसाहत विकसित करण्यात आलेली आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योगांसाठी विविध पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी विविध नवनवीन उद्योग येण्यासाठी मदत होणार आहे. या दोनही औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यात येऊन उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून औद्योगिक विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विंचूर व येवला औद्योगिक वसाहतीसाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
येवला व विंचूर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून विंचूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांकडून गुंतवणूक देखील होत आहे.येवला औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, सांडपाणी, पाणीपुरवठा या पायाभूत सोयी तयार झाल्या आहेत.चिचोंडी येथील ५ एमव्हिए क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावून लवकरच ही औद्योगिक वसाहत सुरू करण्यासाठी भुजबळ यांचे प्रयत्न आहेत.उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विविध विकासकामे या औद्योगिक वसाहतीत करण्यात येत आहे. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन याठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या दोनही वसाहतीत वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील उद्योगांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होणार असून उद्योगांचा अधिक विकास होणार आहे. त्यातून परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद देखील करण्यात आलेली असून लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होणार आहे.