फसवणूक प्रकरणी स्वतःहून संपर्क करण्याचे पोलीसेचे आवाहन
येवला – लग्नाचे अमिश दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश येवला शहर पोलिसांनी केला आहे. या कारवाईमुळे मराठवाडा येथून मुली आणून मुलांकडून लाखो रुपये उकळायचे आणि नंतर मुलींनी पळून जायचे असा प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आला आहे. लता अशोक केदार वय ६० वर्षे गणपती मंदिराच्या बाजूला पारेगाव रोड येथील रहिवासी यांनी या प्रकराची तक्रारी केली. त्यानंतर येवला शहर पोलिसांकडून या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
या प्रकरणात येवला शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यात त्यांनी सांगितले की, आंबेजोगाई ता. बीड येथून आरोपी साहेबराव विठ्ठलराव गिते वय ४३ रा. जायगांव रोड, ब्राम्हणवाडे ता. सिन्नर जि. नाशिक व संतोष मुरलीधर फड़ वय ३७ रा. भुसे भेंडाळी ता. निफाड जि.नाशिक यांना तीन लाख रुपये फसवणूक प्रकरणी २४ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या टीमने अटक केली. त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. परिसरात याबाबतची फसवणूक अजून कोणाची झाली असल्यास ताबडतोब संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडांगळे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ही आहे तक्रार
फिर्यादी लता केदार यांचा मुलगा गणेश याचे लग्न लावुन देतो असे सांगुन आरोपीने लता केदार त्यांचे पती अशोक केदार यांचेकडुन घरी तीन लाख रुपये घेवुन राजश्री काळुंखे हिचे खरे नांव सोना कांबळे ही मातंग समाजाची असतांनाही वंजारी समाजाची आहे असे खोटे सांगुन रिटायर कॉन्सटेबल यांचा मुलगा गणेश याची फसवणूक केली आहे, प्रकरण लक्षात आल्यावर केदार यांनी फिर्याद दिली व रॅकेट उघडकीस आणण्यास मदत केली याबाबत मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे