येवला – येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील एका दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या महिलांनी तीन पैठणी साड्या चोरुन नेल्याची घटना तब्बल पाच दिवसांनी सीसीटीव्ही कॅमेरामुळे समोर आली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामुळे उघडकीस आला. ७५ हजार रुपये किमतीच्या महाराणी प्रकारातील तीन पैठणी साड्या आपल्या पर्स मध्ये लपवून ही चोरी या महिलांनी केली. ही चोरी १२ मार्च झाली असली तरी ती पाच दिवसांनी उघड झाली. साड्यांचा साठा तपासणी दरम्यान तीन पैठणी साड्या कमी भरल्याने दुकानाचे मालक आकाश ठोंबरे यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता ही चोरी समोर आली. येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन तपास सुरू केला आहे.