येवला – येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षण प्रस्तावास नुकतीच जलसंपदा विभागाची मान्यता मिळाली असून यासाठी १६२ कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेसाठी १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेसाठी २०३७ ची लोकसंख्या गृहीत धरून नांदूरमध्यमेश्वर धरणातून २.२६८ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला होता. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या या बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे.
या योजनेसाठी २.२६८ दलघमी पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून आरक्षित करण्यात आले आहे. नांदूरमधमेश्वर मधून हे पाणी जॅकवेल पंपाद्वारे येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आणण्यात येणार आहे.येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पात पाण्याचे शुद्धीकरण करून येथून ग्रॅव्हिटीद्वारे सर्व ४१ गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे.या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, घना माळी मळा-महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे.