येवला : येथील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन यांचेसह संचालक मंडळ, वसुली अधिकारी यांचे विरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. २१ कोटी ९६ लाख ९९ हजाराचा अपहार, ठेवीदारांची फसवणूक प्रकरणात सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
सहाय्यक निबंधक पाडवी हे पारख पतसंसथेचे संचालक मंडळ बरखास्ती नंतर प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. पतसंस्थेचा ताळेबंद प्रमाणे आढावा घेतला असता ती तोटयात असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. पतसंस्थेतील काही रकमा पतसंस्थेत जमा केलेल्याच नाही. ९३ कर्जदारांना मुदत पावती नसतांना व कोणताही मागणी अर्ज नसतांना बेकायदेशीर मुदत पावतीवर कर्ज वाटप करून निधीचा अपहार केला गेला आहे. तसेच अनियीमत कर्ज वाटप करून कर्ज वसुली केलेली नाही. त्याच प्रमाणे सोने तारण कर्ज देखील अनियीमत व कोणतेही तारण न घेता कर्ज वाटप केलेल असुन त्यात अनियमीतता व ठेवीदारांची फसवणुक केली आहे. काहीना कोणताही जामीन अगर तारण न देता कर्ज वाटप केलेले आहे. २०१५ पासुन ते प्रशासक नियुक्तीपर्यन्त सभेचे इतीवृत्त गहाळ केले गेले आहे. आपसात संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणे मंजुर करुन बँकेतुन परस्पर रक्कम काढुन घेवुन २१ कोटी ९६ लाख रुपयेचा अपहार केला व संस्थेच्या सभासदांची ठेविदारांची फसवणुक केल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने येवला सहाय्यक निबंधक कार्यालयात ठेवीदारांसह मुक्काम मोर्चा आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सहकार विभागाने सदर गुन्हा दाखल केला आहे.
येवल्यात प्रहारचे मुक्काम मोर्चा आंदोलन
गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था व सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्था यासह इतर संस्थांच्या ठेवीदारांना ठेवींचे पैसे परत मिळावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी, (दि. 22) येथील सहाय्यक निबंधक कार्यालयावर मुक्काम मोर्चा नेला. यावेळी आंदोलकांनी सहाय्यक निबंधक यांची खुर्ची ताब्यात घेत कार्यालया समोर मुक्काम ठोकला. आंदोलनामुळे सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी, शहर पोलिस ठाण्यात सुभाषचंदजी पारख पतसंस्थेच्या संचालक मंडळासह व्यवस्थापक, वसुलीअधिकारी यांचे विरूध्द अखेर गुन्हा दाखल केल्याने आंदोलन मागे घेतल्या गेले.