नाशिक – येवला शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीची सर्व्हे न.३८१२ गट नं. १०० ब मधील ७ हजार ४८४.६० चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडापैकी ४६७४.५७ चौ.मी जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे मात्र शिवसृष्टी प्रकल्पाची भव्यता, विस्तार आणि मांडणी लक्षात घेता ही जागा कमी पडत होती. यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून शिवसृष्टी व त्याअनुषंगीक कामे करण्यासाठी उर्वरित २ हजार ८१२.०३ चौरस मीटर अतिरिक्त भूखंड देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
येवला शहराच्या लौकिकात व पर्यटनात भर पाडण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपटावर आधारित शिवसृष्टी उभारणेच्या प्रकल्पास, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ४ कोटी आणि २ कोटी असा एकूण ६ कोटी निधी मंजूर आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाचे भव्य दिव्य असे स्वरूप असून यामध्ये सुशोभीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण विषयक अभ्यास, सुसाध्यता, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींची अभ्यास करून पूर्तता करण्यात येणार आहे.
येवला शहरात उभे राहत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचा विस्तार व मांडणी पाहता सदर क्षेत्र कमी पडत होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४६७४.५७ चौ.मी क्षेत्रात अधिक वाढ करण्याबाबत भुजबळांचे प्रयत्न होते त्यामुळे वाढीव २८१२.०३ चौ. मी भूखंड आज सार्वजनिक विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.या प्रकल्पासाठी अतिरिक्त भूखंड मिळाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या विस्तार व मांडणीस मदत होऊन सदर प्रकल्प अधिक भव्य दिव्य होणार असून येवला शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.