येवला – येवला तालुक्यातील नांदूर येथील आम्रपाली पगारे हिने सोनी मराठी टीव्हीवरील इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या निवड चाचणीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. तिच्या या प्रवासाला हातभार लावण्यासाठी सावरगाव विद्यालयात विविध सामाजिक संस्था व व्यक्तींकडून तिला आर्थिक मदतीचा हात देऊन पाठबळ देण्यात आले. नांदूर येथील गौतम पगारे यांची आम्रपाली ही मुलगी. सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील नववीच्या वर्गात शिकते. वडील संगीत वाद्य वाजविण्याचा व्यवसाय करतात एवढीच काय ती पार्श्वभूमी..मात्र आम्रपालीच्या आवाजात जादू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कुठलेही गायनाचे शिक्षण नाही की त्यासाठी उपलब्ध साधन सामग्रीही नाही मात्र सराव आणि जिद्दीच्या बळावर सर्वसामान्य कुटुंबातील या मुलीने अनेकांना आपल्या आवाजाने भुरळ घातली आहे. खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक व्यक्तींसह संस्थांनी यापूर्वी तिचे कौतुक केले आहे.
व्हाईस ऑफ नाशिक सिझन ३ गायनाच्या अंतिम फेरीत आम्रपाली ही मेगा विनर ठरली आहे.आपल्या गायनाला चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी तिने सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल या स्पर्धेत सहभाग घेतला.यासाठी ऑनलाइन झालेल्या दोन्ही निवड फेऱ्यात तिची निवड झाली असून आता बुधवारी मुंबई येथे पुन्हा निवड चाचणीतून तिचे या स्पर्धेतील सहभागाचे भवितव्य ठरणार आहे.या स्पर्धेला जाण्यापूर्वी तीच्या पाठीवर हात ठेवत अनेक दानशूरांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.
आज सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कुल विद्यालयात मनमाड येथील नगरसेविका सविता गिडगे,प्रतिष्ठित व्यापारी कीर्ती मकवाने,
सौ.फाटक,दिंडे,मोरे व इच्छामणी महिला मंडळाच्या वतीने सात हजार शंभर रुपयाची मदत देण्यात आली.महेश ललवाणी यांच्या वतीने देखील मदतीचा हात देण्यात आला.तसेच मनमाड येथील स्नेहलता गायकवाड,मनोज ठोंबरे आदींनी देखील मदत निधी उभारत तीला ४ हजार रुपयाची मदत आज सुपूर्द केली.सावरगाव विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी व शिक्षकांनी देखील तिच्यासाठी मदतीचा हात देत सामाजिक दायित्व निभावले आहे.सावरगाव विद्यालयाच्या प्रांगणात आज नगरसेविका गिडगे तसेच सौ.मकवाने यांच्या हस्ते हा निधी तिला सुपूर्द करण्यात आला.हा निधी उपलब्ध करण्यासाठी गजानन नागरे,मनोज ठोंबरे व हेमत गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी पर्यवेक्षक व्ही.एन.दराडे,गौतम पगारे,मनोज ठोंबरे,राजकुवर परदेशी,पोपटराव भाटे,गजानन नागरे,उमाकांत आहेर,वसंत विंचू,संतोष विंचू,ऋषिकेश काटे,मच्छिंद्र बोडके,सागर मुंडे आदी उपस्थित होते.हा मदतीचा हात आमच्यासाठी आधारवड ठरणार असल्याची प्रतिक्रिया या वेळी आम्रपालीचे वडील पगारे यांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन गजानन नागरे यांनी केले.
सावरगाव पंचक्रोशीतील पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार,गोरखआबा पवार यांनी देखील अर्थिक मदत केली.सेवानिवृत्त पर्यवेक्षक एस.आर.पैठणकर यांनीही मदत केली. येवल्याचे सामाजिक बांधिलकी जपणारे गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख यांनीही आम्रपालीला २० हजारांची मदत दिली आहे.या मदतीतून तिच्यासाठी अद्ययावत संगीत साहित्य खरेदी केले असल्याची माहितीही यावेळी तिचे वडील पगारे यांनी दिली.