येवला – येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायत येथे मासिक मीटिंग संपल्यानंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक संजय व्यवहारे यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवल्याची घटना घडली. यावेळी ग्रामपंचायत दप्तराचे काम घरी घेऊन न जाता कार्यालयातच पूर्ण करावे या अटीवर त्यांची सुटका तासाभरानंतर करण्यात आली. ग्रामसेवक व्यवहारे यांच्यावर भ्रष्टाचार,कामात अनियमितता, तसेच ग्रामपंचायत निवडणुका होऊन साडे पाच महिन्यात एकही विकास काम सुरू न केल्याचा आरोप करत सरपंचासह सदस्यांनी हे पाऊल उचलले. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी डॉ उमेश देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्वरित ग्रामसेवक बदलून देण्याची मागणी केली.
या घटनेबाबत उपसरपंच योगेश पाटील यांनी सांगितले की, घरपट्टी पाणीपट्टी तसेच बाजार लिलाव याचा हिशोब यामध्ये एका महिन्यात १५ हजार रुपयांची तफावत आढळून आली. यामुळे सर्व सदस्यांनी मिळून ग्रामसेवक व्यवहार यांना कार्यालयात कुलूप लावून कोंडून ठेवले होते. नांदगाव तालुक्यातील नागपूर येथून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ग्रामसेवक संजय व्यवहारे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तर येवला तालुक्यातील पारेगाव येथे मास्क आणि आणि सॅनीटाइझर घोटाळ्याचा आरोप देखील व्यवहार यांच्यावर झाल्याचे त्यांनी सांगितले.