येवला – तालुक्यातील तलाठी बदली प्रकरण राज्यभर चर्चेत असतांना आता अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. य़ेथे तलाठ्याने वारसाला डावलून चक्क जमीन आपल्या पत्नीच्या नावावर केली आहे. तालुक्यातील हडप सावरगाव येथे हा प्रकार समोर आला आहे. येथील तलाठीने हडप सावरगाव गट नंबर ५७ /३ मधील ८ एकर शेतजमीन मूळ वारसांना डावलत नोंदीमध्ये फेरफार करून आपल्या बायकोच्या नावावर करून घेतली. हा सर्व प्रकार मूळ वारस दिव्यांग असलेल्या मंदा पवार रा. बाभळेश्वर, यांना आपल्या मातुलठान तालुका येवला येथील आपल्या गावी आल्यानंतर लक्षात आला
मातुलठाण तालुका येवला येथील मयत राधाकिसन कदम यांची मुलगी मंदा पवार या जमिनीच्या वारस होत्या. मात्र तलाठी अतुल थूल यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत मूळ वारसांवार अन्याय केला आहे. सदर जमीन पुन्हा वारसांच्या नावावर करावी व तलाठ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित कराव अशी मागणी येवल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांच्याकडे मूळ वारस मंदा पवार यांनी केली आहे. दरम्यान येवला तालुका येथील कुसमाडी येथे देखील एका प्रकरणात असा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान तहसीलदार प्रमोद हिले यांनी या प्रकरणात तलाठी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.