येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येवल्यासह नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गेल्या २४ तासात १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला आहे. अनेक ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करण्यात काम सुरू आहे. या नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून बाधित झालेल्या प्रत्येक घटकाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र प्रथमतः पूरग्रस्त भागातील नागरिक तसेच पशूंचे जीव वाचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रथम प्राधान्य असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
गेल्या २४ तासात नाशिक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत तातडीने मदत कार्य उपलब्ध करून दिले.
गेल्या २४ तासात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत पोलीस, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मदतकार्यात सहभागी व्हावे, तसेच प्रत्येक विभागांच्या प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून तातडीने आवश्यक हालचाली करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ, तसेच ज्याला गहू नको असतील त्याला तेवढेच तांदूळ वाटप करण्याचे निर्देश दिले. याबरोबरच प्रति कुटुंब ३ किलो डाळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आवश्यकतेनुसार आपपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्याच्या देखील सूचना दिल्या असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच ही परिस्थिती आपण अतिशय गांभीर्यपूर्वक हाताळत असून लोकांचे जीव वाचविण्यास आपले प्राधान्य आहे. तसेच त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवल्याचे प्रभारी तहसीलदार पंकज नेवसे, कृषी अधिकारी शुभम बेरड, तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, येवला शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, किसन धनगे, मोहन शेलार, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, डॉ.प्रवीण बुल्हे, पांडुरंग राऊत, रावसाहेब आहेर, गणपत कांदळकर, गोटू मांजरे, सुनील पैठणकर, तानाजी आंधळे, मयूर सोनवणे, सचिन सोनवणे, माधव जगताप, संतोष राऊळ, सुनील एडाईत, अमोल एडाईत, अनिल सोनवणे, नितीन जाधव, चंद्रकांत सांबरे, विशाल परदेशी, दत्ता थोरात, भूषण लाघवे, प्रकाश बागल, योगेश खैरनार, नवनाथ थोरात, पार्थ कासार, सौरभ जगताप,ओंकार मढवई, गणेश गवळी, देविदास निकम,प्रताप दाभाडे,किरण दाभाडे,बापू शेठ दाभाडे,भाऊसाहेब कदम,नवनाथ दाभाडे,भाऊसाहेब मंडलिक,अरुण मोरे,पंचम साळवे,नवनाथ पोळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील अंदरसुल येथे कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली. त्यानंतर येवला शहरातील हुडको कॉलनी या रहिवासी भागात घरांमध्ये पाणी शिरले याठिकाणी पाहणी केली.
त्यानंतर सावरगाव परिसराची पाहणी करत पाटोदा शहरातील शॉपिंग सेंटर भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तातडीने मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्न, धान्याचे वाटप
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गहू, तांदूळ यासह अन्न, धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.