येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ज्या शहरात पारंपरिक उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्या शहरांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्या उद्योगाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याच माध्यमातून येवल्यात पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या पैठणी उद्योगाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. तसेच पैठणीला जगातील सर्वोत्तम वस्त्र म्हणून ओळख मिळण्यासाठी पैठणीला युनेस्को मध्ये पोहचविणार असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
प्रसार भारती आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पैठणी ‘करघा पैठणी द क्वीन ऑफ सारीज’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आज येवला येथील लक्ष्मी मल्टिप्लेक्स राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या स्क्रिनिंग पार पडले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, निर्माते भास्कर विश्वनाथन, नायिका उपश्री, सह दिग्दर्शक सम्राट कपूर, श्री.साळुंखे, राज्य वस्त्र उद्योग धोरण समितीचे सदस्य मनोज दिवटे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, पप्पू सस्कर यांच्यासह पदाधिकारी व विणकर बांधव उपस्थित होते.
ते म्हणाले की, येवला शहरात अतिशय पूर्वीपासून पैठणी बनवली जाते. सन २००४ साली आपण या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर येथील पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या. याठिकाणी पैठणी क्लस्टर आपण निर्माण केले. त्यामुळे येवला शहराला एक नवीन ओळख निर्माण झाली. पूर्वी केवळ चार ते पाच दुकाने होती आज ५५० हून अधिक दुकाने आहे. तसेच ५ हजाराहून अधिक हातमाग विणकर बांधव या परिसरात आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी १२.५० कोटी रुपये खर्च करून पैठणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे. त्याचबरोबर रेशीम पार्क देखील उभारण्यात येत आहे. आपण एवढ्यावर थांबणार नाही तर युनेस्को मध्ये आपण पैठणीला घेऊन जाणार असून जगातील सर्वोत्तम वस्त्र म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी आले प्रयत्न आहे. तसेच पैठणीच्या प्रचार प्रसारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी सांगितले.