नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मोबाईलच्या माध्यमातून येवल्याच्या नागरीकास ३४ लाख रूपयांना गंडविणा-या सायबर भामट्यास ग्रामिण पोलीसांनी बेड्या ठोकल्या. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद गाठून पथकाने ठकबाजाच्या मुसक्या आवळल्या असून संशयिताने दोन बँक खात्यात वळविलेली सहा लाखाची रक्कम गोठविण्यात यश आले आहे.
मोहम्मद अफताब दिलशाद मोहम्मद असे संशयिताचे नाव आहे. येवला येथील दिलीप सुकदेव जानराव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत भामट्यांनी वैधता पूर्ण झालेल्या पॉलीसिचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून तसेच विश्वास संपादन करीत पॉलीसी आणि टॅक्सच्या बहाण्याने ३३ लाख ३९ हजार ४१८ रूपयांची आर्थीक फसवणुक केली होती. याबाबत २४ जून रोजी जानराव यांनी ग्रामिण पोलीसांच्या सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.
अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, पोलीस नाईक परिक्षीत निकम व अंमलदार खालकर आदींच्या पथकाने गुह्यातील बँक खाते व फसवणुक करणा-या व्यक्तीची तांत्रीक माहिती मिळवून ही कारवाई केली. लोणी जि. गाजियाबाद गाठून पथकाने संशयितास बेड्या ठोकल्या असून त्याने गुह्याची कबुली दिली आहे. या कारवाईत वेगवेगळया बँक खात्यात वर्ग केलेली ६ लाख २८१ रूपयांची रक्कम गोठविण्यात पोलीसांना यश आले आहे.