नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱ्या ममदापूर साठवण तलाव योजनेच्या १५ कोटी ९८ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकास मृद व जलसंधारण विभागाकडून सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या तलावाचे उर्वरित काम पूर्ण होऊन येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागातील सिंचनात मोठी वाढ होणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्यातील ममदापूर येथे ममदापूर साठवण तलावास मंजुरी मिळाली आहे. ममदापूर साठवण तलाव वनविभागाच्या २८.०६ हेक्टरवर साकारण्यात येत असून वनविभागाची मंजुरी मिळून प्रकल्पाचे काम देखील सुरू आहे. या योजनेच्या अंदाजपत्रकात वाढ झाल्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावास मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली असून यासाठी १५ कोटी ९८ लाख रुपयांचा निधीस मंजुरी देण्यात आला आली आहे.
साठवण तलाव ममदापूर ता. येवला जि. नाशिक ही योजना ममदापूर गावाजवळील तापी नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.