नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्यातील उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱ्या ममदापूर साठवण तलावाच्या २८.०६ हेक्टर जमीन वळतीकरण प्रस्तावास वनविभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज प्रख्यापित झाला.त्यामुळे येवला तालुक्यातील सतत दुष्काळाच्या छायेत असणारा उत्तरपूर्व भाग लवकरच सुजलाम सुफलाम होऊन सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.
या प्रकल्पाच्या २८.०६ हेक्टर जमिनीच्या वळतीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित होता. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रस्तावास वनविभागाकडून मंजुरी मिळाली असून प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे.
ममदापुर साठवण तलाव मेळाचा बंधारा हा प्रकल्प १५ कोटी ७४ निधीतून साकारण्यात येत आहे.येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग हा सतत दुष्काळग्रस्त असल्याने या ठिकाणची सिंचन क्षमता अधिक वाढविण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे.
सन २०१७ मध्ये् कार्यारंभ आदेश दिलेले होते. मात्र हा प्रकल्प ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात येत असून वनविभागाच्या २८.०६ हेक्टर जागेवर साकारला जाणार असल्याने राज्य आणि केंद्रीय वने व पर्यावरण विभागाच्या विविध परवानग्यांअभावी हे काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेर ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
राज्य वन्यजीव मंडळ, राष्ट्रीय वन्यजीव मंडळ स्थायी समिती, केंद्र शासनाचा वने आणि पर्यावरण विभाग आदी विभागासह विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते. केंद्र शासनाच्या वने आणि पर्यावरण विभागाची मान्यता आदी विविध मान्यतांसाठी जलसंधारण विभागाकडून प्रयत्न सुरू होते.दि २३ मे २०२२ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला दि ६ मे २०२२ मधील मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून मान्यता दिली. त्यानंतर जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत या समितीने ममदापुर राखीव संवर्धन क्षेत्रातील या साठवण तलावाच्या स्टेज- १ जमीन वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. जलसंधारण विभागाने विविध अटींची पूर्तता करून नागपूर येथील केंद्र शासनाच्या विभागीय अधिकार प्रधान समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडून स्टेज -२ अंतिम मंजुरी प्राप्त झाली होती. .
या तलावाचे पाणलोट क्षेत्र १८ चौरस किलोमीटर आणि एकूण क्षमता ही ३५.६७ द.ल.घ.फु इतकी असणार आहे. या धरणाची लांबी २२० मीटर तर सांडव्याची लांबी ही ७९ मीटर इतकी प्रस्तावित आहे. बंधाऱ्यामुळे ममदापूर परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून साठवण तलावाचा ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील वन्य जीव आणि प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार आहे.